Tuesday, October 15, 2024

मी तसाच बरा होतो

 मी तसाच बरा होतो....वठलेला 

कशाला धुमारे फोडलेस?


आता आशेचे कोंब येतील 

स्वप्नांच्या कळ्या होतील

नकोच ते,मी तसाच बरा होतो...गोठलेला 


मग मोहाची फुलपाखरे येतील 

येता जाता रंग उधळतील 

नकोच ते,मी तसाच बरा होतो...साठलेला 


पावसात अंगावर शहारा येईल 

मन चिंब चिंब धारा होईल 

अम्म..नकोच ते,मी तसाच बरा होतो..दाटलेला


नको ते धुमारे नको ते शहारे 

नको धुंद वारे नको ते पिसारे 

 नको च ,राहू दे ना तसाच .. आटलेला 

Tuesday, March 19, 2019

चांदण्यांच्या पावलांनी

चांदण्यांच्या पावलांनी, तू असे घरट्यात यावे
चिमुकल्या ओठातल्या,हासण्याने घर भरावे...

सौख्य यावे ,दुःख जावे
वेदनांचे गीत व्हावे
बोबड्या बोलातूनी तू, आमुच्या कानी घुमावे...

मृत्तिकेला गंध यावे
स्पंदनांना छंद यावे
इंद्रचापाच्या परी तू , ह्या घराला रंग द्यावे..

घास द्यावे,ध्यास द्यावे
आमुचेही श्वास द्यावे
पारिजाताच्या परी तू, जीवनी या घमघमावे..

तू निजावे,आम्ही जागावे
स्वप्न तुझे, आम्ही बघावे
घे भरारी तू अशी की, या नभाचे पंख व्हावे..
चांदण्यांच्या पावलांनी, तू असे घरट्यात यावे....

-आई बाबा

Tuesday, July 14, 2015

आई-बाबा

आई-बाबा

मी इथे  साता समुद्रा पार
तुम्ही दोघं नजरेच्या टप्प्या पल्याड
भेटावसं वाटतं खूप पण...... नाही भेटता येत ..
मग मी सकाळी धुकं होतो आणि घराला वेढून घेतो.
 नंतर  प्राजक्त होतो आणि तुमच्या दोघांजवळ                                                      दरवळतो
तुम्ही लक्ष नाही  दिलंत तर मांजर होऊन  पायात घुटमळतो

पूजेच्या वेळी मी घंटा होऊन  किणकिणतो
आई बरोबर तासंतास स्वयंपाक घरात लुडबुडतो 
तुमची बोटं हार्मोनियम वर फिरतात तेव्हा तिथेच रेंगाळतो
जेवताना मात्र तुम्ही म्हणता म्हणून,  थोडा वेळ "गप्प"राहतो ...

मग खिडकीतल्या चांदण्याकडून तुम्ही
शांत झोपलात याची खात्री करतो                      
आणि  "पश्चिमे"चा वारा
 होऊन तुमच्या पायांना स्पर्श करतो... 

 मी तिथे नसलो तरीही मी असतोच ..
 डोळे मिटले कि तुम्हाला समोर बघतोच..
 तुम्ही हि इथे असता ..
 वारा  होऊन अवचित डोक्यावरून हात फिरवता …
 पावसाच्या धारांनी आशीर्वाद बरसवता …
 आणि चांदण्याच्या दुलईत मला थोपटून निजवता....