Tuesday, July 14, 2015

आई-बाबा

आई-बाबा

मी इथे  साता समुद्रा पार
तुम्ही दोघं नजरेच्या टप्प्या पल्याड
भेटावसं वाटतं खूप पण...... नाही भेटता येत ..
मग मी सकाळी धुकं होतो आणि घराला वेढून घेतो.
 नंतर  प्राजक्त होतो आणि तुमच्या दोघांजवळ                                                      दरवळतो
तुम्ही लक्ष नाही  दिलंत तर मांजर होऊन  पायात घुटमळतो

पूजेच्या वेळी मी घंटा होऊन  किणकिणतो
आई बरोबर तासंतास स्वयंपाक घरात लुडबुडतो 
तुमची बोटं हार्मोनियम वर फिरतात तेव्हा तिथेच रेंगाळतो
जेवताना मात्र तुम्ही म्हणता म्हणून,  थोडा वेळ "गप्प"राहतो ...

मग खिडकीतल्या चांदण्याकडून तुम्ही
शांत झोपलात याची खात्री करतो                      
आणि  "पश्चिमे"चा वारा
 होऊन तुमच्या पायांना स्पर्श करतो... 

 मी तिथे नसलो तरीही मी असतोच ..
 डोळे मिटले कि तुम्हाला समोर बघतोच..
 तुम्ही हि इथे असता ..
 वारा  होऊन अवचित डोक्यावरून हात फिरवता …
 पावसाच्या धारांनी आशीर्वाद बरसवता …
 आणि चांदण्याच्या दुलईत मला थोपटून निजवता....

4 comments:

  1. अप्रतिम !
    खूपच सुंदर !
    कौतुकाला शब्द अपुरे पडावे इतकी सुंदर …….

    ReplyDelete

  2. खूपच छान …
    हळव्या मनाला मोरपिसाप्रमाणे अलगद स्पर्शणारी ....................
    इतके दूर असूनही एकदम खूपच जवळ आल्यासारखे वाटले .....................

    ReplyDelete